तुमचे नाव मतदार यादीत आहे का?
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातच अजूनही तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ज्यांनी अजूनही आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध आहे. ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. त्यामुळे मतदारांनी आपल्या नावाची नोंद करावी.
वारी एनर्जीजचा आयपीओ 28 ऑक्टोबरला शेअर होणार
वारी एनर्जीजच्या आयपीओद्वारे 4321.44 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार आहे. आयपीओमध्ये एक समभागाचे मूल्य 1503 रुपये निश्चित करण्यात आले आहे. या आयपीओच्या खुल्या होण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये दमदार प्रतिसाद मिळत असून, वारी एनर्जीजच्या आयपीओवर ग्रे मार्केटमध्ये 85 टक्के अधिक प्रीमियमवर ट्रेड सुरु आहे. वारी एनर्जीजचा आयपीओ 28 ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसईवर शेअर होणार आहे.
अजित पवारांना मोठा धक्का, 850 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरुच आहे. आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणखी 250 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे. पक्षाच्या विविध पदांवरून राजीनामे देणाऱ्यांची संख्या आता 850 वर पोहोचली आहे. दरम्यान, मानकर यांनीही अजित पवारांची साथ सोडली आहे. त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का आहे.
वडिल भाजपमध्ये, मुलगा राष्ट्रवादीत अन् उमेदवारी मागितली जरांगेंकडे
वडिल भाजपमध्ये, मुलगा राष्ट्रवादीत आणि उमेदवारी मागायला दोघेही मनोज जरांगे पाटलांकडे आल्याचे समोर आले आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे आणि त्यांचे सुपूत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांनी जरांगेंची भेट घेतली. तसेच, उमेदवारी मागीतल्याची चर्चा आहे. दरम्यान, अनुसूचित जातीसाठी उमरगा-लोहारा विधानसभा आरक्षित आहे. त्यामुळे येथून इच्छूक उमेदवारांची संख्या वाढली आहे.
गरम पाणी प्यायल्याने खरच वजन कमी होतं का?
गरम पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास थेट मदत होत नाही, पण काही प्रकारे ते प्रक्रिया सुधारण्यास मदत करू शकते. गरम पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अन्न चांगले पचते. गरम पाण्यामुळे मेटाबॉलिझम वाढतो, ज्यामुळे अधिक कॅलरीज जाळता येतात. गरम पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करते, जे वजन कमी करण्यास सहाय्यक ठरू शकते. योग्य प्रमाणात पाणी पिणे वजन कमी करण्यात मदत करते. गरम पाणी पिल्याने तुम्ही हायड्रेटेड राहता.