आचारसंहिता लागू....
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घोषित केली असून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.२० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताच लगेचच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे
नेमकी आचारसंहिता असते काय, कोणते नियम त्यात असतात हे आपण जाणून घेऊ.
आचारसंहिता म्हणजे काय ?
देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने काही विशेष नियम बनवले आहेत. निवडणूक आयोगाच्या या नियमांना आचारसंहिता असं म्हटलं जातं.निवडणुकीदरम्यान या नियमांचे पालन करणं सरकार, नेते आणि राजकीय पक्षांना बंधनकारक असतं. एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहिताचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आयोगाच्या नियमानुसार कठोर कारवाई केली जाते.
आचारसंहिताची सुरुवात कधी झाली?
१९६० साली केरळ विधानसभा निवडणुकीपासून आचारसंहिताची सुरुवात झाली. राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली होती. कोणकोणत्या नियमांचं पालन करावं हेदेखील पक्ष आणि उमेदवारांनी ठरवलं होतं.१९६२च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर १९६७च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिताची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये वेळेनुसार नियमांची भर घालण्यात आली.
आचारसंहिता कधीपासून कधीपर्यंत असते ?
देशात दर पाच वर्षांनी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होतात. वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात. निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू होते.तेव्हापासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे मतमोजणीपर्यंत आचारसंहिता लागू असते.त्यातील प्रत्येक नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. आचारसंहितात राजकीय पक्ष तसेच त्यांच्या उमेदवारांनी कशा पद्धतीने वर्तन करावं हेदेखील स्पष्ट केलेलं असते.
आचारसंहिताचे नियम कोणते ?
आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही.
* कोणतीही सरकारी घोषणा, पायाभरणी किंवा उद्धाटन करता येत नाही.
* प्रचारात सरकारी वाहने, विमान, बंगले, सरकारी सुविधांचा वापर करता येत नाही.
* रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते.
* पैसा, धर्म, जात यांच्या नावावर निवडणूक रॅलींमध्ये मतं मागण्यावर बंदी आहे. .
* याचबरोबर, निवडणुकीशी संबंधित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत.
No comments:
Post a Comment