महाराष्ट्राची ही कितवी विधानसभा निवडणूक?
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1962 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुका राज्यात झाल्या. त्यावेळी 264 पैकी 215 जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जिंकल्या होत्या. आता 20 नोव्हेंबर 2024 ला 15व्या महाराष्ट्र विधानसभेसाठी यंदा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या प्रतिस्पर्ध्यांमध्ये विधानसभेची लढत होणार आहे.
जगातील पहिलं निवडणुक चिन्ह कोणतं आणि ते कोणाला दिलं?
कुठलीही निवडणूक असली की निवडणूक चिन्हं ही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. निवडणूक चिन्हापुढील बटण दाबूनच आपण कोणत्याही उमेदवाराला मतदान करतो. मात्र जगातील पहिलं निवडणूक चिन्ह कोणत्या पार्टीला आणि कधी दिलं गेलं? तर 234 वर्षांपूर्वी अलेक्झांडर हॅमिल्टन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत फेडरलिस्ट पार्टी हा पहिला संघटित राजकीय पक्ष स्थापन झाला. या पक्षाचे चिन्ह गोलाकार अंगठी होते. हे जगातील पहिले निवडणूक चिन्ह. येथूनच जगभरातील संघटित पक्षांमध्ये निवडणूक चिन्हांची प्रक्रिया सुरू झाली.
महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 24 मतदारसंघ कसे वाढले ?
राज्यातील 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे मतदान होणार आहे. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीनंतर आत्तापर्यंत राज्याच्या मतदारसंघात तब्बल 24 मतदारसंघ वाढले आहेत. स्वतंत्र महाराष्ट्रातल्या पहिल्या निवडणुकीत 264 मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली होती. पुढे मतदसंघ पुनर्रचना करण्यात आली. आणि महाराष्ट्रातील मतदार संघांची संख्या 288 एवढी झाली.
मतदार यादीत नाव कसं शोधाल?
विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून आपलं नाव मतदार यादीत आलय का हे तपासण्याची वेळ आता आली आहे. भारतीय निवडणूक आयोग त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांमधून त्या त्या मतदारसंघातील मतदारांची
यादी जाहीर करत असतं. यासाठी https://voters.eci .gov.in/download-eroll या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचं राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि इतर तपशील भरून मतदारयादीत तुमचं नाव आहे का हे तपासता येईल.
EVM मशीन कुठे बनते?
गेल्या दशकभरातील अशा किती निवडणुका असतील ज्यामध्ये हारल्यावर EVM वर खापर फुटलं नसेल? 1982 मध्ये सर्वात पहिल्यांदा केरळच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये EVM मशीनचा वापर झाला. मतपेटीत मतदानाची चिठ्ठी टाकण्याऐवजी पहिल्यांदाच बटण दाबून मतदान झाले. पण ही मशीन तयार कुठे होते? पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL), हैदराबादला त्याची रचना आणि विकास करण्याचे काम सोपवण्यात आले. नंतर भारत इलेक्ट्रॉनिक लि, (BEAL) बंगळुरुमधील सहकारी संस्था निवडली गेली.
सर्वाधिक मते NOTA ला मिळाली तर काय होते?
अनेकदा मतदारांना प्रश्न पडतो जर एखाद्या मतदारसंघात NOTA या पर्यायाला कुठल्याही इतर उमेदवारापेक्षा अधिक मते मिळाली तर काय होते? जर असे झाले तर दुसऱ्या क्रमांकाची मते ज्या उमेदवाराला मिळाली आहेत त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येते. NOTA या पर्यायाला कोणतेही निवडणूक मूल्य नसून पक्षांना सक्षम उमेदवार देण्याकरता दबाव टाकण्यासाठी नोटाची तरतूद करण्यात आली आहे. मतदानाचा अधिकार हा वैधानिक असून संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे.
भारताव्यतिरिक्त कोणत्या देशात EVM वापरली जातात?
भारतात निवडणुकीत मतदानासाठी आधुनिक EVM मशीन वापरली जातात. आतापर्यंत EVM मशीन्स देश पातळीवरील 3 निवडणुकांत आणि राज्यातल्या 113 निवडणुकांमध्ये वापरली गेली आहेत. मात्र भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये ही EVM मशीन्स वापरली जातात. आजघडीला सुमारे 33 देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान होतं. यात व्हेनेझुएला, अर्जेंटिना, इराण, अमेरिका यासारख्या अनेक देशांमध्ये EVM वापरलं जातं.
पहिल्यांदा मतदान करताय? मतदानकेंद्रावरील 'या' प्रक्रिया लक्षात ठेवा..
राज्याच्या विधानसभांचं मतदान 20 नोव्हेंबरला आहे. अनेकजण यंदा पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी मतदानकेंद्रावर जाऊन गोंधळ होऊ नये यासाठी काही प्रक्रीया लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
1. मतदान केंद्रात प्रवेश केल्यावर तीन अधिकारी बसलेले असतात. मत देण्यासाठी नंतर बोटाला शाई लावण्यासाठी या अधिकाऱ्यांकडे जावे लागते.
2. दुसरी पायरी म्हणजे मतदार यादीतून मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा देणे.
3. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन EVM वर उपलब्ध यादीतून राजकीय पक्षाला निळे बटण दाबून मत द्यायचे असते. 4. मत दिल्यानंतर EVM वरचा LED लाल होतो. आणि मतदान झाल्याची पुष्टी करणारी स्लिप तयार होते.
भारतात मतदानाची शाई कोण बनवतं?
भारतात मतदान झाल्यानंतर बोटाच्या तर्जनीला लावली जाणारी साई ही भारतातच तयार होते हे तुम्हाला माहित आहे का? 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापर झाला. कर्नाटकातील म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड या कंपनीत निवडणुकीची ही शाई तयार केली जाते. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी या संस्थेकडे आपल्या election ink चे अधिकृत लायसन्स आहे. या शाईची कुठेही विक्री केली जात नाही. फक्त सरकार आणि निवडणुकीशी संबंधित यंत्रणांना त्याचा पुरवठा केला जातो.
आचारसंहिताची सुरुवात कशी झाली?
राज्यात किंवा देशात कुठलीही निवडणूक असली की आचारसंहिता लावली जाते. या आचारसंहिताची सुरुवात 1960 साली केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली. तेव्हा राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली. कुठल्या नियमांचे पालन करणार हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवले. 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 1967 च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकांत आचारसंहिताची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले. निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही. परंतु आचारसंहितातील काही नियम आयपीसीच्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात.
महाराष्ट्रातील 288 पैकी किती मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. राज्यातील एकूण 288 मतदारसंघांपैकी 29 मतदार संघ हे अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत. 25 मतदारसंघ हे अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. तर उरलेले 234 मतदार संघ हे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहेत. राखीव असणाऱ्या या 54 मतदारसंघांमध्ये त्या त्या समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी देता येते.
मतदाराला NOTA वापरण्याचा अधिकार कधीपासून?
27 सप्टेंबर 2013 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना त्यांचं मत देताना 'वरीलपैकी काहीही नाही' म्हणजेच NOTA वापरण्याचा पर्याय असावा असा निर्णय दिला. यासाठी निवडणूक आयोगाला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (EVM) या पर्यायासाठी एक बटन अनिवार्य करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे निवडणूक आयोगानं नोटा हे चिन्ह सर्व EVM मशीनच्या शेवटच्या बटनावर लावण्यात आले.
No comments:
Post a Comment