25 तारखेला सोमवारी वानखेडे स्टेडियमला शपथविधी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हॅट्रिक केली आहे. भाजपला पुन्हा एकदा सर्वात जास्त मतं मिळाले असून, महायुतीला एकत्र 234 जागांवर विजय मिळाला आहे. 1990 नंतर भाजपने तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकल्या असून, या विक्रमामुळे भाजप एकमेव
पक्ष म्हणून ठरला आहे. नव्या सरकारचा शपथविधी 25 तारखेला होणार असल्याची माहिती आहे. शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्याची योजना महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
महायुतीत सीएम पदासाठी 2-2-1 फॉर्म्युला ठरला?
महायुतीतील मुख्यमंत्री पदासाठी एक फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार, फडणवीस 2 वर्ष, शिंदे 2 वर्ष आणि अजित पवार 1 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. तिन्ही नेत्यांमध्ये सीएम पदासाठी इच्छाशक्ती दिसून येते. या फॉर्म्युलामुळे महायुतीतील सत्ता वाटपावर चर्चा सुरू झाली असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे.
सीएनजी महाग; रिक्षा भाड्यात वाढीची शक्यता
विधानसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशी सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका आता रिक्षा भाड्यांवर बसण्याची शक्यता आहे. रिक्षा युनियनने प्रति किलोमीटर 2-2.5 रुपयांनी भाडे वाढवण्याची मागणी केली आहे. दरवाढीमुळे प्रवाशांच्या खर्चात मोठी भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना आणखी आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा देणार, शिंदेंची घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं म्हटलं आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लाडक्या बहिणींचे आभार मानले असून, त्यांना शुभेच्छा दिल्या. वर्षा निवासस्थानी शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा केली, जे महायुतीच्या जाहीरनाम्यात वचन दिलं होतं. शिंदे यांनी लाडक्या बहिणींना राज्यात इतिहास घडवण्याचे श्रेय दिले.
'या' महिन्यात येऊ शकतो PM Kisan योजनेचा 19वा हप्ता
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने जारी केला जातो. 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी झाला होता, त्यामुळे 19 वा हप्ता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. या योजनेद्वारे, भारत सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे, जी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता देशभरातील शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदिक डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगाने दहावीनंतर थेट बीएएमसी पदवी प्रवेशाची संधी दिली आहे. विद्यार्थ्यांना साडेसात वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर होण्याची संधी मिळेल. यामध्ये दोन वर्षांचा प्री आयुर्वेद प्रोग्रॅम (पीएपी) आणि साडेचार वर्षांचा बीएएमएस अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना 75% हजेरी आणि 50% गुणांची अट पूर्ण करावी लागेल. प्रवेशासाठी नीट-पीएपी परीक्षा आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment